मी बालरक्षक ,ही माझी यशोगाथा 
@ तूर्त अध्यापनासाठी गेलो आणि शाळा ८ वी पर्यंत केली. @
बालरक्षक 
श्री. राजन गौतम गरुड.
प्राथमिक शिक्षक जि. प शाळा ,खोरीचापाडा
           २००९ साली वयाच्या २१ व्या वर्षी  प्रथमच या आदिवासी पाड्यावरील  खोरीचापाडा या शाळेत नियुक्ती झाली असता पाड्यावरील शैक्षणिक परिस्थिति पाहून आदिवासी पाड्यात शिक्षण घेणार्या प्रत्येक मुलांसाठी काम करायचे. बालरक्षकाची संकल्पना येण्याच्या पूर्वीपासून बालरक्षकाची भूमिका मी  नकळत पार पाडत होतो. शालेय प्रवाहात ६ ते १४ वयोगटातील मुलांनी शाळेत यावे यासाठी सुरुवातीलाच मी विद्यार्थ्यांची बोलीभाषा आत्मसात केली आणि त्यांच्याशी वारली बोलीभाषेत संवाद साधू लागलो,मुलांच्या प्रत्येक क्रियेत सहभागी होऊ लागलो आणि खर्या अर्थाने मी त्यांचा प्रिय मित्र झालो होतो. प्रत्येक विद्यार्थी शाळेच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी त्यांच्यातील कलगुणांना वाव देण्यासाठी ‘ बालनटरंग ’ सारखे नृत्यविष्कार ,नाट्याविष्कार सादर करण्यासाठी मंच उपलब्ध करून दिला. 
  
        सदर खोरीचापाडा या शाळेतून २०१४ या शैक्षणिक वर्षात जि. प. शाळा गांजे येथे तूर्त अध्यापणासाठी निवड करण्यात आली. सलग २ वर्षे या शाळेत अध्यापन करीत असतांना गावातील शाळेत कधीही दाखल न झालेली ८ विद्यार्थीमित्र, सतत गैरहजर ५ विद्यार्थीमित्र  आणि स्थलांतरित ४ विद्यार्थिमित्र शाळेत दाखल केले. यांना शाळेत टिकवून ठेवण्यासाठी मी पूर्वीच्या शाळेतील उपक्रम पुंनरावृत्ती केली आणि जणू या सर्व विद्यार्थ्यांचा मित्र होऊन गेलो. गेल्या अनेक वर्षापासून जि प शाळा गांजे ४ थी पर्यंतच शाळा होती ,५वी साठी येथील विद्यार्थ्यांना ५ ते ६ किलोमीटर अंतरावर माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी पायपीट करावी लागत होती. या परिस्थितीचा विचार करता १५० च्या वर पट आणि आम्ही दोन शिक्षक  तुर्त अध्यापनासाठी असतांना ५ वी चा वर्ग सुरू करून गळती होणारे ,शाळाबाह्य असणार्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेण्यासाठी सोय उपलब्ध केली. अनेक उपक्रम राबवून पट टिकवून ठेवला.आश्रमशाळेतील आणि दूरवर शाळेत जाणारी मुले पुन्हा गावात शिक्षणासाठी परत आली. 
२०१६ साली आमची मूळ शाळेवर नियुक्ती झाली परंतु, गांजे शाळा आता उच्च प्राथमिक म्हणजेच  १ ली ते ८ वी ची शाळा झालेली आहे. 
           याच गांजे  शाळेत शाळाबाह्य मुलांना शाळेचे आकर्षण राहावे व अध्ययन क्षमतेचा विकास व्हावा यासाठी ज्ञानरचनावाद पद्धतीने दिवाळीच्या सुट्टीत  फरशीवर  आणि भिंतीवर चित्रे काढत असताना मुंबईतील U & WE या मुंबईच्या संस्थेने पर्यटनाला आलेले असताना सहज शाळा पाहण्यासाठी आले आणि त्यावेळी काही विद्यार्थी आणि मी तेथे उपस्थित आहे हे पाहून आनंदित झाले आणि आम्ही करत असलेल्या कामाचे स्वरूप पाहून प्रथम शाळेला शैक्षणिक साहित्य पुरवठा केला. यानंतर म्हणजे आजपर्यंत शाळेच्या शैक्षणिक सहली,संगणक सुविधा , एचडी प्रोजेक्टर,सुधारात्मक टॉयलेट , हँडवॉश , मैदान रुंदीकरण, शाळेची रंगरगोटी, विद्यार्थ्यांना दरवर्षी शैक्षणिक साहित्य  अशा अनेक सुविधा आजपर्यंत देत आहेत. विशेष म्हणजे या संस्थेने आज इयत्ता १२ वी पर्यंत शिक्षणाची सुविधा येथील विद्यार्थ्यांना होईल याकरिता प्रशस्त इमारत आणि मोफत शिक्षणाची सुविधा उपलब्ध करणार आहेत. 
            विशेष म्हणजे जि प शाळा गांजे ही २ वर्षासाठी तूर्त अध्यापनासाठी मिळालेली पालघर जिल्ह्यातील आमदाराच्या गावातली शाळा आहे.तरीही काहीतरी नवीन करण्याच्या दृष्टीने शाळाबाह्य,दूरवर उच्च प्राथमिक शिक्षणासाठी जाणारे,स्थलांतरित होणार्या माझ्या विद्यार्थिमित्रासाठी कार्य केले. इयत्ता ४थी पर्यंत असणार्या शाळेचे इयत्ता ८ वी पर्यंत नेण्याची दिशा दिली.आज संस्थेच्या माध्यमातून २०१४ साली इ. ४ थी ची शाळा आज २०१९ रोजी  उच्च माध्यमिक शाळेचे स्वरूप घेऊ पाहत आहे.  
           आज ही आदिवासी वारली बोलीभाषेतून शाळेत विद्यार्थिमित्रांना शिक्षण देऊन भाषेची अडचण दूर करत शाळेचा पट वाढवण्याचा उपक्रम राबवित आहे. 
मी बालरक्षक आहे , हीच माझी यशोगाथा आहे.

