इयत्ता ११ वी प्रवेश प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात होणार ऑनलाईन.. Update Class 11th Admission Process 2025-26

Rajan garud
0

 इयत्ता ११ वी  प्रवेश प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात होणार  ऑनलाईन..  
Class 11th Admission Process 2025-26 Update 


 राज्यातील कोणत्याही कनिष्ठ महाविद्यालयात घरी बसून फक्त शंभर रुपये प्रवेश प्रक्रिया फी भरून ऑनलाइन अर्ज करून प्रवेश घेता येणार 


अकरावी प्रवेश १९ मेपासून

यंदा सर्व प्रवेश ऑनलाइन : राज्यातील प्रवेश होणार


इयत्ता अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेला दि. १९ मेपासून सुरुवात होणार असून, यंदा विद्यार्थ्यांना एकाच अर्जावर राज्यातील कुठल्याही कनिष्ठ महाविद्यालयात अकरावी प्रवेशासाठी अर्ज करता येणार आहे. या प्रवेशप्रक्रियेत काहीसा बदल करण्यात आला असून तो विद्यार्थ्यांसाठी अधिक सोयीचा ठरणार आहे. याशिवाय विद्यार्थीसंख्या आणि जागांची उपलब्धता याचाही त्यात ताळमेळ साधला जाणार आहे.


शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी अकरावी प्रवेशाच्या प्रक्रियेत शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे महत्त्वाचा बदल केला आहे. याअंतर्गत राज्यातील सर्व क्षेत्रातील प्रवेश हे ऑनलाइन पद्धतीनेच होणार आहेत. यापूर्वी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरसह अन्य महत्त्वाच्या महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये केंद्रीभूत ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतून प्रवेश दिले जात होते. उर्वरित क्षेत्रात, विशेषतः ग्रामीण भागात ऑफलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया पार पडत होती. मात्र, सर्व प्रवेश हे ऑनलाइन पद्धतीने राबविण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे घरी बसून विद्यार्थ्यांना राज्यभरातील कुठल्याही महाविद्यालयात इयत्ता अकरावी प्रवेशासाठी अर्ज करता येणार आहे.



संकेतस्थळात बदल


यापूर्वी क्षेत्रनिहाय संकेतस्थळ उपलब्ध होते. परंतु, यंदाच्या वर्षी अकरावीचे प्रवेश हे


https://mahafyjcadmissions.in


 या संकेतस्थळावरून पार पडणार आहे. केंद्रीभूत पद्धतीने प्रवेश प्रक्रिया होणार असल्याने विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीक्रमाचे राज्यभरातील महाविद्यालयांचे पर्याय एकाच अर्जामध्ये नोंदविता येणार आहेत.

ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया १९ मेपासून सुरू होणार असल्याची घोषणा शिक्षण विभागाने शुक्रवारी (दि. ९) प्रवेश प्रक्रिया सुरु होण्यापूर्वी उच्च माध्यमिक विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालयांची नोंदणी प्रक्रिया राबविली जात आहे.




सन २००९-२०१० या शैक्षणिक वर्षापासून मुंबई, ठाणे व रायगड जिल्ह्यातील मुंबई महानगर विकास प्राधिकरण (MMRDA) क्षेत्रातील सर्व माध्यामिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांचे इयत्ता ११ वी चे प्रवेश ऑनलाईन पध्दतीने करण्याबाबत संदर्भ क्रमांक ३ येथील दिनांक २८.०५.२००९ च्या शासन निर्णयान्वये आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. सदर आदेशामध्ये संदर्भ क्रमांक ४ व ५ येथील शासन निर्णयान्वये वेळोवेळी सुधारणा करण्यात आल्या आहेत.

संदर्भ क्रमांक ६ येथील दिनांक ०३.०३.२०१४ च्या शासन पत्रान्वये सन २०१४-१५ या शैक्षणिक वर्षापासून पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील इयत्ता ११ वीचे प्रवेश ऑनलाईन पध्दतीने करण्यास शासन मान्यता देण्यात आलेली होती. इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत त्रुटी असल्याचे नमूद करुन मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे जनहित याचिका क्रमांक १२७/२०१४ दाखल करण्यात आली होती. मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी सदर जनहित याचिका प्रकरणी दि.०५.०६.२०१५ रोजी दिलेल्या निर्णयातील निर्देशानुसार इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रक्रियेबाबत सन २०१६-१७ साठी धोरण निश्चित करुन संदर्भ क्रमांक १० मधील शासन निर्णय दिनांक २८.०३.२०१६ रोजी निर्गमित करण्यात आला होता. इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया मुंबई महानगर विकास प्राधिकरण (MMRDA), पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रासोबत सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षापासून नागपुर, अमरावती, नाशिक, औरंगाबाद या महानगरपलिका क्षेत्रातील सर्व मान्यता प्राप्त उच्च माध्यामिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना लागू करण्याचा निर्णय संदर्भ क्रमांक ११ येथील दिनांक ०७.०१.२०१७ च्या शासन निर्णयान्वये घेण्यात आला होता.

मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील मुंबई महानगर विकास प्राधिकरण (MMRDA) क्षेत्र, पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, नागपुर महानगरपालिका, अमरावती महानगरपालिका, नाशिक महानगरपालिका व छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका या क्षेत्रातील सर्व मान्यता प्राप्त उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता ११ वी चे प्रवेश ऑनलाईन पध्दतीने करण्याबाबत दिनांक २८.०५.२००९, दिनांक ०७.०६.२०१०, दिनांक १६.०३.२०१२ व दिनांक ०७.०१.२०१७ च्या शासन निर्णनयान्वये कार्यपध्दती निश्चित करण्यात आली होती. यामध्ये वेळोवेळी सुधारणा करून इ.११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आलेल्या आहेत.

सन २०१८-१९ च्या इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत मा. उच्च न्यायालय, खंडपीठ नागपूर येथे २ रिट याचिका (रिट याचिका क्र. ३८३१/२०१८ व रिट याचिका क्र.३९३२/१८) दाखल करण्यात आल्या होत्या. सदर रिट याचिकांबाबत मा. उच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेले आदेश, सन २०१८-१९ च्या प्रवेश प्रक्रियेदरम्यान तसेच तद्नंतर आलेले अनुभव, पालकांच्या व विद्याथ्यांच्या तक्रारी व त्या अनुषंगाने शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) पुणे यांच्या कडून शासनास प्राप्त अहवाल इ. विचारात घेऊन सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापर्यंत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आलेली होती. या पार्श्वभुमीवर दिनांक २५.०२.२०२५ च्या शासन निर्णयान्वये इयत्ता ११ वीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने संपूर्ण राज्यात गुणवत्तेनुसार करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. या प्रक्रियेमध्ये अधिक सुसूत्रता आणण्यासाठी इ.११ वी प्रवेश प्रक्रियेसाठी तरतूदी निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार पुढीलप्रमाणे शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे.
शासन निर्णय :-
सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षा पासून संपूर्ण राज्यातील सर्व मान्यता प्राप्त उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयातील इ. ११ वी चे प्रवेश ऑनलाईन पध्दतीने व गुणवत्तेनुसार करण्यात येणार आहेत. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून खालील प्रमाणे कार्यपध्दती अवलंबिण्यात यावी :-

अ) ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया :-


(৭) राज्यातील सर्व क्षेत्राकरीता उच्च माध्यमिक कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या उच्च माध्यमिक शाळा/स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालय/वरिष्ठ महाविद्यालय यांचेशी संलग्न सर्व शाखांमधील इयत्ता ११ वीच्या प्रवेशाकरीता या शासन निर्णयातील तरतुदी लागु राहतील.


(२) राज्यातील अल्पसंख्यांक दर्जासह अन्य सर्व उच्च माध्यमिक कला, वाणिज्य व विज्ञान या शाखांमधील इयत्ता ११ वीच्या प्रवेशाकरीता या शासन निर्णयातील तरतूदी लागु राहतील.


(३) शैक्षणिक सत्र २०२५-२६ पासून राज्यातील राज्यमंडळ संलग्नित उच्च माध्यमिक कला, वाणिज्य व विज्ञान या शाखांचे इयत्ता ११ वी चे प्रवेश केंद्रीय पध्दत्तीने व ऑनलाईन प्रणाली द्वारा करण्यात यावे. तर शैक्षणिक सत्र २०२५-२६ पासून HSVC व्यवसायिक चे प्रवेश ऑफलाईन पध्दतीने होतील.


(४) खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व उच्च माध्यमिक शाळा, स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालयांशी संलग्न कनिष्ठ महाविद्यालय यांनी विहित कालमर्यादेत आवश्यक कागदपत्रे वरीष्ठ कार्यालयांना उपलब्ध करून देणे, विहित मुदतीत माहिती संकेतस्थळावर अद्ययावत करणे, इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे अनुषंगिक कामकाज विहित मुदतीत करणे, याबाबत शाळा स्तरावरील कामकाज पारदर्शकपणे करण्याची जबाबदारी खाजगी व्यवस्थापनाची असेल. इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया पारदर्शकपणे व गुणवत्तेच्या आधारे करण्यात यावी.

(५) खाजगी व्यवस्थापनाने माहिती देण्यास विलंब करणे, टाळाटाळ करणे, खोटी/दिशाभूल करणारी माहिती सादर करणे, इत्यादीकरीता खासगी व्यवस्थापनास दंड आकारणे, सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात प्रवेशास मनाई करणे, इत्यादी व आवश्यकतेनुसार कायदेशीर कारवाई करण्यासाठी विभागीय शिक्षण उपसंचालक यांना प्राधिकृत करण्यात येत आहे.


(६) विद्यार्थ्यांना एकावेळी एका प्रवेश अर्जाद्वारे कला, वाणिज्य व विज्ञान शाखांपैकी प्रत्येक फेरीमध्ये एका शाखेची निवड करता येईल. प्रत्येक फेरीच्या वेळी शाखा बदल करण्याची मुभा असेल. विद्यार्थ्यांना कोणत्याही एका शाखेकरीता अर्ज करता येईल.


(७) इयत्ता ११ वी प्रवेशाकरीता इच्छुक विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश अर्ज करणे आवश्यक असेल. बनावट कागदपत्रे सादर करून प्रवेश निश्चित केल्यास आवश्यकतेनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. इयत्ता १० वीच्या गुणपत्रिकेमध्ये फेरफार केल्यास इयत्ता ११ वीच्या प्रवेश प्रकियेतून सन २०२५-२६ करीता प्रतिबंधित करण्यात येईल.


(८) इयत्ता १० वीचा ऑनलाईन निकाल घोषित झाल्यानंतर विद्यार्थ्यांना इयत्ता ११ वी प्रवेशाकरीता प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल.


(९) सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून इ. ११ वी ऑनलाईन प्रवेशाकरिता पुढीलप्रमाणे फेऱ्यांचे नियोजन करण्यात येईल. सर्वसाधारण चार फेऱ्यांचे आयोजन करण्यात येईल. सर्व प्रवेश इयत्ता १० वीच्या गुणांच्या आधारे करण्यात येतील. राज्य मंडळ संलग्नित इयत्ता १० वी मधील विषयांच्या उच्चतम ५ विषयांचे गुण गुणवत्तेकरीता विचारात घेण्यात यावेत. राज्य मंडळाव्यतिरिक्त इतर मंडळांच्या माध्यमिक स्तरावरील इयत्ता १० मधील माहिती व तंत्रज्ञान किंवा तत्सम विषय वगळता अन्य ५ विषयांमधील उच्चतम गुण हे गुणवत्तेकरीता विचारात घेण्यात येतील. समान गुणवत्तेचे दोन किंवा त्यापेक्षा अधिक उमेदवार असल्यास जन्म दिनांकानुसार जेष्ठतम विद्यार्थ्यांच्या प्रवेशास प्राधान्य देण्यात येईल. या दोन स्तरावर (गुण व जन्मदिनांक) समान असल्यास विद्यार्थी, पालक, आडनाव इंग्रजीमध्ये घेऊन वर्णाक्षरांच्या क्रमानुसार जेष्ठतेनुसार प्रवेश करण्यात येतील.


(१०) सर्वसाधारण ४ फेऱ्यांचे गुणवत्तेनुसार आयोजन करण्यात येईल. यामध्ये सामाजिक व समांतर आरक्षण लागू असेल. तद्नंतर "सर्वांसाठी खुली (OPEN FOR ALL)" या विशेष फेरीचे आयोजन करण्यात येईल, यामध्ये ऑनलाईन पध्दतीने रिक्त जागा दाखविण्यात येतील. उर्वरीत रिक्त जागांकरीता दोन दिवसांचा कालावधी देऊन उच्च माध्यमिक शाळा/स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालय/वरिष्ठ महाविद्यालय निवडण्याची संधी विद्यार्थ्यांना असेल. उपलब्ध रिक्त जागांपेक्षा जास्त अर्ज आल्यास केवळ इयत्ता १० वी च्या प्राप्त गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार प्रवेश निश्चित करण्यात येतील, याकरीता संगणकीय प्रणालीचा व ऑनलाईन पध्दतीचा उपयोग करून प्रवेश देण्यात येतील.


(११) अल्पसंख्यांक कोटा अल्पसंख्यांक उच्च माध्यमिक विद्यालय/कनिष्ठ महाविद्यालयांना अल्पसंख्यांक कोटा ५० टक्के असेल. या कोट्यामधील जागा शाळा व्यवस्थापनास सर्वसाधारण नियमित ३ फेऱ्या संपेपर्यंत गुणवत्तेनुसार भरण्याची मुभा असेल. सर्वसाधारण नियमित ३ फेऱ्या संपेपर्यंत अल्पसंख्यांक कोट्यातील जागा कोणत्याही परिस्थितीत प्रत्यार्पित करता येणार नाहीत. भरलेल्या जागांची माहिती संकेतस्थळावर अपलोड करण्यासाठीच्या सूचना वेळोवेळी संकेतस्थळावर देण्यात येतील. त्यानुसार कार्यवाही करणे व्यवस्थापनास बंधनकारक असेल. या कोट्यामधील प्रवेश क्षमतेपेक्षा कमी प्रवेश झाल्यास उर्वरित रिक्त जागा चौथी नियमित फेरी सुरू होण्यापूर्वी प्रत्यार्पित करता येतील. अल्पसंख्यांक विभागाच्या दिनांक १८/०६/२०१४ च्या शासन निर्णयातील धार्मिक व भाषिक अल्पसंख्यांक कोट्यातील प्रवेश करताना त्या-त्या समूहातील विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्रवेश द्यावेत. त्या समूहातील विद्यार्थी उपलब्ध न झाल्यास धार्मिक व भाषिक दर्जानुसार अंतर्गत बदलाप्रमाणे प्रवेश करता येतील. तद्नंतरही जागा रिक्त राहिल्यास प्रत्यार्पित रिक्त जागांसाठी सामाजिक व समांतर आरक्षणाचे तत्व बिगर अल्पसंख्यांक शाळांच्या प्रवेशाप्रमाणे असेल.


(१२) व्यवस्थापन कोटा सर्व उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना व्यवस्थापन कोट्याअंतर्गत ५ टक्के जागा आरक्षित असतील, या कोट्यातील जागा सर्वसाधारण नियमित दुसरी फेरी संपेपर्यंत गुणवत्तेनुसार भरता येतील. तद्नंतर तिसऱ्या फेरीच्या टप्यावर या कोट्यातील प्रवेश क्षमतेपेक्षा कमी झाल्यास उर्वरित रिक्त जागा प्रत्यार्पित करणे अनिवार्य असेल. शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना व्यवस्थापन कोटा लागू राहणार नाही.


(१३) इन-हाऊस कोटा इन-हाऊस कोट्याअंतर्गत खाजगी व्यवस्थापनाच्या उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना १० टक्के जागा आरक्षित असतील. या कोट्याअंतर्गत भरण्यात येणाऱ्या जागा गुणवत्तेनुसार ऑनलाईन पध्दतीने भरण्यात याव्यात. उच्च माध्यमिक शाळा असलेल्या परिसरात/आवारात माध्यमिक शाळा असल्यास या माध्यमिक शाळेतील उमेदवारांना हा कोटा लागू असेल. बिगर अल्पसंख्यांक व अल्पसंख्यांक शाळांना इनहाऊस कोटा लागू असेल. सर्वसाधारण नियमित दुसरी फेरी संपेपर्यंत या कोट्यातील जागा भरता येतील. तद्नंतर सदर जागा रिक्त असल्यास प्रत्यार्पित करणे व्यवस्थापनास अनिवार्य असेल. राज्यातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इन हाऊस कोटा ५० टक्के असेल. या कोट्याकरीता इयत्ता १० वीची परीक्षा राज्यातील शासकीय/स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधून उत्तीर्ण होणारे विद्यार्थी पात्र असतील.


(१४) विद्यार्थ्यांनी द्यावयाचा पसंतीक्रम, प्रवेश रद्द करणे, प्रवेश न घेतल्यास प्रतिबंधित करणे यासंदर्भातील कार्यपध्दती पुढीलप्रमाणे राहील.


(१४.१) विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेशाकरिता प्राधान्य क्रम भरताना किमान १ प्राधान्यक्रम भरणे अनिवार्य असेल व कमाल १० पसंतीक्रम भरता येतील, प्रथम प्राधान्य क्रमांकाच्या उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश गुणवत्तेनुसार मिळाल्यास अशा विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित न केल्यास त्यांना "सर्वांसाठी खुला (OPEN FOR ALL)" या फेरी पर्यंत दुसरी/तिसरी व चौथी फेरी मध्ये सहभागी होता येणार नाही. नियमित फेरीमध्ये प्रथम प्राधान्यक्रम दिलेल्या विद्यार्थ्यांना त्याच महाविद्यालयात जागा मिळाल्यास तेथे प्रवेश घेणे बंधनकारक असेल. प्रथम प्राधान्यक्रम असलेले शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेशासाठी जागा मिळूनही प्रवेश न घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील नियमित फेऱ्यांमध्ये सहभागी होता येणार नाही. सदर विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रक्रियेतील नियमित फेरीमध्ये प्रतिबंधित केले जाईल. मात्र अशा विद्यार्थ्यांना "सर्वांसाठी खुला (OPEN FOR ALL)" या विशेष फेरीमध्ये सहभागी होता येईल.


(१४.२) प्रथम प्राधान्य क्रमाच्या शाळा/कनिष्ठ महाविद्यालय प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर त्यांचा प्रवेश रद्द करता येईल. तथापि त्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये पुन्हा सहभागी व्हावयाचे असल्यास अशा विद्यार्थ्यांना "सर्वांसाठी खुला (OPEN FOR ALL)" या विशेष फेरीमध्ये सहभागी होता येईल.


(१४.३) प्रथम पसंतीक्रम व्यतिरिक्त अन्य प्राधान्यक्रमांच्या शाखेत प्रवेश मिळूनही विद्यार्थ्यांनी प्रवेश न घेतल्यास, प्रवेश प्रक्रियेच्या उर्वरित सर्वसाधारण फेरी व विशेष फेरीमध्ये "सर्वांसाठी खुला (OPEN FOR ALL)" सहभाग घेऊ शकतील, तथापि घेतलेले प्रवेश रद्द करण्याची मुभा असेल. प्रवेश रद्द केल्यानंतर उच्च माध्यमिक शाळा/स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालय/वरिष्ठ महाविद्यालय बदलण्यासाठी अर्ज करता येईल.


(१४.४) विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेश अर्जातील मजकुर व प्रत्यक्षात प्रवेशाच्या वेळी सादर केलेली कागदपत्रे व माहितीमध्ये तफावत/मिन्नता आढळल्यास विशेष फेरीपर्यंत प्रवेश प्रक्रियेपासून वंचित ठेवण्यात येईल. परंतू "सर्वांसाठी खुला (OPEN FOR ALL)" या प्रवेश फेरीमध्ये प्रवेश घेण्यास संबंधित विद्यार्थी पात्र असतील. तथापि इयत्ता १० वीच्या गुणपत्रकामध्ये फेरफार असल्यास त्यापुढील कोणत्याही फेरीमध्ये प्राधान्यक्रम भरण्यास विद्यार्थी पात्र असणार नाही.


(१४.५) महाविद्यालयात/शाळेत विद्यार्थ्यांची कागदपत्रे तपासून एकदा प्रवेश निश्चित केल्यास त्या प्रवर्गातील उमेदवारास प्रवेश रद्द करून दुसऱ्या ठिकाणी प्रवेश (गुणवत्तेनुसार) मिळाल्यास तो विद्यार्थी पात्र असेल, नवीन प्रवेशित उच्च माध्यमिक शाळा / स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालय/वरिष्ठ महाविद्यालयाशी संलग्न उच्च माध्यमिक शाळा यामध्ये कागदपत्रे पडताळणीची आवश्यकता असणार नाही. तथापि मूळ कागदपत्रे नवीन प्रवेशित उच्च माध्यमिक शाळा/ स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालय/वरिष्ठ महाविद्यालयात विहीत मुदतीत जमा करावी लागतील.


(१४.६) प्रत्यक्ष प्रवेशावेळी आरक्षित प्रवर्गातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडे स्वतःचा जातीचा दाखला असावा. विद्यार्थ्यांचा जातीचा दाखला नसल्यास वडिलांचा जातीचा दाखला आरक्षित प्रवर्गाकरीता ग्राह्य धरता येईल.


(१४.७) विद्यार्थ्यांने प्रवेश निश्चित करताना शासन नियमाप्रमाणे खाजगी व्यवस्थापनाने निर्धारित केलेले शुल्क भरणे बंधनकारक असेल.


(१४.८) विद्यार्थ्याने प्रवेशानंतर विषयामध्ये बदल केल्यास सदर विषयासाठी शासन नियमाप्रमाणे खाजगी व्यवस्थापनाने निर्धारित केलेले शुल्क भरणे बंधनकारक असेल.


(१५) प्रत्यक्ष प्रवेशित झालेली विद्यार्थी संख्या लक्षात घेता उच्च माध्यमिक शाळा/स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालय/वरिष्ठ महाविद्यालय यांना प्रत्यक्ष अभ्यासक्रम सुरु करण्याचा निर्णय घेता येईल. दिनांक ११ ऑगस्ट २०२५ ला उच्च माध्यमिकचे अध्यापन व अध्ययनाचे कार्य सुरु करणे उच्च माध्यमिकच्या सर्व शाखांना आवश्यक असेल.


(१६) नियमित चार फेऱ्या संपल्यानंतर विशेष फेरीचे आयोजन करण्यात यावे. "सर्वांसाठी खुला (OPEN FOR ALL)" या विशेष फेरीमध्ये ऑनलाईन पध्दतीने रिक्त जागा असल्यास विद्यार्थ्यांना तेथे गुणवत्तेनुसार प्रवेश घेण्याची मुभा असेल,


(१७) प्रती विद्यार्थी प्रवेश नोंदणी करताना रुपये १००/- एवढे शुल्क आकरण्यात येईल. सदर शुल्क ऑनलाईन पध्दतीने स्वीकारण्यात येईल. त्याकरीता संचालक व सहाय्यक संचालक लेखा यांचे संयुक्त खाते सुरू करण्यात यावे.


(१८) आरक्षणासंदर्भात सूचना :-


(१८.१) सामाजिक आरक्षण, समांतर आरक्षण, अल्पसंख्यांक कोटा, व्यवस्थापन कोटा, इन-हाऊस कोटा इ. साठीच्या आरक्षित जागांचे प्रमाण शासनाच्या प्रचलित धोरणानुसार राहील.


(१८.२) इन-हाऊस कोट्याकरीता राखीव ठेवण्यात आलेल्या जागा ज्या संस्थेतर्फे उच्च माध्यमिक विद्यालय/कनिष्ठ महाविद्यालय चालवले जात असेल, त्या संस्थेमार्फत त्याच परिसरामध्ये/आवारात चालविली जात असलेल्या माध्यमिक शाळेतील विद्यार्थी इन-हाऊस कोट्याकरिता पात्र राहतील.


(१८.३) समांतर आरक्षण हे कप्पीकृत आरक्षण (Compartmentalised Reservation) आहे. त्यामुळे उच्च माध्यमिक विद्यालय/कनिष्ठ महाविद्यालय निहाय जागा निश्चित करताना केवळ सामाजिक आरक्षणाची संख्या नमूद न करता समांतर आरक्षणाच्या जागांची निश्चिती करून त्याप्रमाणे ऑनलाईन प्रणालीमध्ये दाखविण्यात यावी. सदर प्रमाणे कार्यवाही करणे क्रमप्राप्त असल्याने सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाच्या प्रक्रियेमध्ये शासनाच्या समांतर आरक्षण धोरणानुसार सद्यस्थितीत महिलांसाठी ३०%, दिव्यांग/अपंगांसाठी ४%, प्रकल्पग्रस्त व भूकंपग्रस्तांसाठी २%, तसेच (अ) बदलीने आलेल्या राज्य/केंद्र शासन/खाजगी क्षेत्रातील कर्मचारी यांचे पाल्य (ब) आजी-माजी सैनिकांच्या पाल्य/स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्य (क) आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धामध्ये विजेते/सहभागी होणारे खेळाडू विद्यार्थी व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धामधील पदक विजेते खेळाडू विद्यार्थी यांच्याकरिता ५% जागा राखीव ठेवण्यात येतील. महिला व बालविकास विभागाच्या दि.०२ एप्रिल, २०१८ च्या शासन निर्णयानुसार अनाथ मुलांसाठी खुल्या प्रवर्गातून १ टक्के समांतर आरक्षण देण्यात यावे,


(१८.४) खेळाडू विद्याथ्यांना राखीव जागांवर प्रवेश देत असताना त्याचा प्राधान्यक्रम आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमधील पदक विजेते खेळाडू, राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धामधील पदक विजेते खेळाडू व त्यानंतर राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धामध्ये सहभागी खेळाडू असा राहील.


(१८.५) सामाजिक आरक्षणाकरिता प्रवर्ग निहाय उपलब्ध जागांपैकी समांतर आरक्षणाकरीता वर नमूद प्रमाणानुसार प्रवर्ग निहाय जागा आरक्षित ठेवाव्यात.


(१८.६) समांतर आरक्षणाकरीता राखीव जागा चार फेरीपर्यंत त्या-त्या प्रवर्गाकरीता आरक्षित ठेवण्यात याव्यात.


(१८.७) समांतर आरक्षणाच्या जागा संबंधित सामाजिक आरक्षणाच्या प्रवर्गातून भरणे आवश्यक आहे. सदर बाबीचे काटेकोरपणे पालन करावे.


(१८.८) सामाजिक व समांतर या दोन्ही आरक्षणानुसार विद्यार्थी उपलब्ध न झाल्यास सामान्य प्रशासन विभागाच्या दि.०५.१२.१९९४ रोजीच्या शासन निर्णयातील तरतूदीनुसार उर्वरित रिक्त जागा परिवर्तित करण्यात येतील.


(१८.९) सामाजिक आरक्षणाबाबतच्या राज्य शासनाच्या सर्व तरतूदी संपूर्ण राज्यातील इ.११ वी प्रवेश प्रक्रियेसाठी लागू राहतील.


(१८.१०) प्रवेश प्रक्रियेसाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कातून पुढील बाबींवर खर्च करता येईल. ऑनलाईन प्रणाली ऑपरेट करणारी संस्था/पुरवठादार, प्रवेश नियंत्रण कक्ष, आवश्यक सुविधा, संगणक, साधन सामग्री, प्रवास भत्ता, विद्याथ्यर्थ्यांकरीता शाळांमध्ये मदत/मार्गदर्शक केंद्र तयार करणे इ. साठी खर्च करता येईल.


(१८.११) इ.११ वी ऑनलाईन प्रवेशित विद्यार्थ्यांची माहिती राज्य मंडळास उपलब्ध करून द्यावी. इ.१२ वी परीक्षेकरीता संबंधित महाविद्यालयातून अर्ज भरण्यात आलेले विद्यार्थी केवळ ऑनलाईन व्यवस्थेतूनच आलेले आहेत याची खातरजमा राज्य मंडळाने करावी.


(१८.१२) प्रत्येक फेरीच्या वेळी प्रवेश इच्छुक उमेदवारांना प्रत्येक फेरीमध्ये सहभागी होण्याची सहमती दर्शविणे अनिवार्य असेल. सहमती दर्शविली नसल्यास त्या फेरीमध्ये या उमेदवारांचा विचार प्रवेशांकरीता केला जाणार नाही.


(१८.१३) इ.११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतून प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या सन २०२५-२६ च्या उच्च माध्यमिक स्तराची शिक्षकांची संचमान्यता करताना विचारात घ्यावी. शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) यांनी त्यानुसार आवश्यक सूचना संबंधित शिक्षण उपसंचालक/शिक्षणाधिकारी यांना द्याव्यात.


(१८.१४) आय.टी.आय. (I.TJ.)/ पॉलीटेक्नीक (Polytechnic) मध्ये प्रवेशित होणारे बरेचसे विद्यार्थी इ. ११ वी प्रवेशाकरिता केंद्रीय प्रवेश प्रक्रियेअंतर्गत देखील अर्ज भरतात. काही विद्यार्थी इ.११ वी ला प्रवेश घेतात त्यांना प्रवेश रद्द करून आय.टी.आय. (I.T.I / पॉलीटेक्नीक (Polytechnic) मध्ये प्रवेश घ्यावा लागतो. परंतु ज्यांनी इ.११ वी प्रवेश प्रक्रियेत अर्ज केला आहे, तसेच आय.टी.आय. (I.T.J) / पॉलीटेक्नीक (Polytechnic) मध्येही प्रवेश घेतला आहे, असे विद्यार्थी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेमध्ये पुन्हा पुन्हा येत राहतात. अशा विद्यार्थ्यांकरीता अर्ज मागे घेण्याचा (Withdrawal of Application) पर्याय उपलब्ध करून देण्यात येईल.


(१८.१५) इ.११ वी मध्ये प्रवेशित होणाऱ्या शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने व गुणवत्तेनुसार होईल.


(१८.१६) संपूर्ण राज्याकरीता विद्यार्थ्यांना एकच प्रवेश अर्ज करावा लागेल. या प्रवेश अर्जानुसार त्याला संपूर्ण राज्यातील कोणतेही ठिकाणच्या उच्च माध्यमिकची शाखा निवडण्याचा पर्याय उपलब्ध असेल,


(१८.१७) इ.११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत यापूर्वी निर्गमित केलेल्या शासन निर्णयातील ज्या तरतूदी सदर शासन निर्णयातील तरतुदींशी विसंगत असतील त्या तरतुदी ऐवजी या शासन निर्णयातील तरतूदी लागू राहतील.


(१८.१८) ऑनलाईन प्रणालीवर सर्व उच्च माध्यमिकच्या शाळा/कनिष्ठ महाविद्यालय/चरिष्ठ महाविद्यालय यांनी वार्षिक शुल्काचे विवरण प्रसिध्द करणे, खाजगी विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित तत्वावरील उच्च माध्यमिक शाळांचे शैक्षणिक शुल्क बाबत महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियमन) अधिनियम २०११ च्या तरतूदी व तद्नंतर निर्गमित नियम व शासन निर्णयाच्या तरतूदी लागू राहतील व आवश्यकते नुसार शुल्क जमा करण्याची व्यवस्था राज्यस्तरीय समितीने करावी.


(१८.१९) प्रवेश प्रक्रिया संपल्यानंतर प्रवेशित विद्यार्थ्यांच्या नावाची यादी, शाखा निहाय, कट ऑफ निहाय इत्यादी माहिती प्रकाशित करण्यात येईल.


(१८.२०) व्दिलक्षी अभ्यासक्रमाचे प्रवेश उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालय/वरिष्ठ महाविद्यालय स्तरावर आरक्षण व गुणवत्तेनुसार प्रवेश करण्यात यावेत.


(१८.२१) इयत्ता ११ वीचे प्रवेश ज्या पध्दतीने गुणवत्तेनुसार होतात त्याच आधारे उच्च माध्यमिक स्तरावरील तांत्रिक विषयांचे प्रवेश गुणवत्तेच्या आधारे निश्चित करण्यात यावे. (गृहविज्ञान, संगणक शास्त्र, माहिती तंत्रज्ञान, कृषी, फिशरी, इत्यादी.)


(१८.२२) राज्य मंडळाव्यतिरिक्त अन्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना इयत्ता ११ वी (राज्य मंडळ संलग्न उच्च माध्यमिक) प्रवेशाकरीता ऑनलाईन प्रक्रियेत नोंदणी करणे आवश्यक असेल.


(१९) प्रवेश प्रक्रियेचा जिल्हास्तर ते राज्यस्तर खर्च करण्याच्या तरतूदी :-


(१९.१) जिल्हा स्तरावर ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या कामी जिल्हास्तरावरील कंत्राटी कर्मचारी, प्रवेश कक्ष, उदबोधन व प्रशिक्षण खर्च, वाहन भत्ता, प्रवास भत्ता, बैठक खर्च, जाहीरात इ. खर्च जिल्ह्यामधून प्राप्त होणाऱ्या एकूण जमा रक्कमेपैकी २५ टक्केच्या मर्यादेत खर्च करण्याची परवानगी संबंधित जिल्हा स्तरीय समितीस राहील.


(१९.२) विभागस्तरावर प्राप्त होणाऱ्या जमा रक्कमेपैकी १० टक्के रक्कम प्रवेश प्रक्रियेच्या कामी विभागस्तरावरील कंत्राटी कर्मचारी, प्रवेश कक्ष, उद्बोधन व प्रशिक्षण खर्च, वाहन भत्ता, प्रवास भत्ता, बैठक खर्च, जाहीरात, इ. खर्च करण्यास परवानगी असेल. 


(१९.३) संचालनालय स्तरावर व अन्य निम्नस्तरावरील कंत्राटी कर्मचारी, प्रवेश नियंत्रण कक्ष, उद्बोधन व प्रशिक्षण खर्च, प्रवास देयके, प्रवास भत्ता, बैठक खर्च, साहित्य, जाहीरात व अन्य अनुषंगिक सुविधा करीता येणारा खर्च करण्याची परवानगी असेल.


(१९.४) प्रवेश प्रक्रियेच्या संकेत स्थळ विकसन व संगणक कार्यक्रम विकसनाकरीता येणारा संपूर्ण खर्च प्रवेश प्रक्रियेतून जमा होणाऱ्या व सध्या जमा असलेल्या खर्चातून करण्यात यावा.


(१९.५) त्रयस्थ संस्थेकडून संपूर्ण प्रवेश प्रक्रियेचे व सॉफ्टवेअरचे ऑडीट करण्यासाठी निविदा प्रक्रिया संचालनालय स्तरावरुन करण्याची परवानगी यापुर्वी देण्यात आलेली आहे. त्रयस्थ संस्थेच्या निष्कर्षातील बाबी शासनास तात्काळ कळविण्यात याव्यात.


(१९.६) प्रवेश निश्चित केल्यानंतर प्रवेश रद्द करावयाचा असल्यास शाळेत जमा केलेल्या एकूण शुल्कापैकी प्रवेशाच्या दिनांकापासून पहिल्या २० दिवसात प्रवेश रद्द केल्यास ५ टक्के कपात करण्यात येईल. त्यानंतरच्या ४० दिवसांत केल्यास १० टक्के कपात करण्यात येईल. तदनंतर प्रवेश रद्द केल्यास कोणतेही शुल्क परत मिळणार नाही. सदर परत करावयाचे शुल्क शाळांनी ऑनलाईन पध्दतीने संबंधितांच्या बैंक खाती जमा करणे बंधनकारक राहील. शाळेला अशा मुलांची कागदपत्रे अर्ज करण्याच्या दिवशी किंवा प्रत्यक्ष कागदपत्रे संकलित करण्याच्या दिवशी हस्तांतरीत करणे बंधनकारक राहील. यामध्ये खाजगी व्यवस्थापन जाणीवपूर्वक टाळाटाळ, विलंब करीत असल्यास पहिल्या प्रसंगाकरीता ५० हजार रुपये दंड व तद्नंतरच्या प्रत्येक प्रसंगास १ लाख रुपये प्रमाणे दंड आकारण्यात येईल. (वास्तविकता पडताळून व शहानिशा करुन)


(२०) राज्यमंडळ व विभागीय मंडळाची जबाबदारीः-


(२०.१) मार्च २०२५ च्या वार्षिक परीक्षेत प्रविष्ट झालेल्या इ. १० वी च्या विद्यार्थ्यांची निकालापूर्वी आणि निकालासह आवश्यक ती माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे हे शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), पुणे/केंद्रिय प्रवेश समितीने निश्चित केलेल्या ऑनलाईन सेवा पुरवठादारास उपलब्ध करुन देतील.


(२०.२) ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे कामकाज विहित वेळेत, बिनचूक सुरळीतपणे पार पाडण्यासाठी तसेच सदर प्रक्रियेत्त कुठलीही अडचण येवू नये यासाठी माहितीची सुरक्षितता राहण्यासाठी शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी राज्य मंडळाकडून आवश्यक माहिती प्राप्त करुन त्यानुसार निश्चित केलेल्या ऑनलाईन सेवा पुरवठादार यांच्या समवेत करारनामा करावा.


(२१) शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), पुणे यांची जबाबदारी :-


(२१.१) इ.११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया संदर्भात सदरहू शासन निर्णयाच्या अनुषंगाने अंमलबजावणी रुपरेषा ठरविणे व या प्रक्रियेचा आढावा घेवून त्याअनुषंगाने कार्यवाही करणे.


(२१.२) शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), पुणे यांनी याकरीता आवश्यकते प्रमाणे विहित प्रपत्र निश्चित करावेत.


(२१.३) शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), पुणे यांनी सदर प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने करण्यासाठी सेवा पुरवठादार निविदा प्रक्रियेच्या अटी व शर्तीनुसार निश्चित करण्याची कार्यवाही करावी.


(२२) विभागीय शिक्षण उपसंचालक यांची जबाबदारी :-


(२२.१) विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व विभाग हे उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांकडून प्राप्त झालेली शाखानिहाय विहित प्रपत्रामधील माहिती उदा. शाखानिहाय तुकडया, माध्यम, अनुदानित, अंशतः अनुदानित, विना अनुदानित, कायम विनाअनुदानित, स्वयं अर्थसहाय्यीत वर्गनिहाय व शाखानिहाय विद्यार्थी प्रवेश क्षमता कनिष्ठ महाविद्यालयामध्ये उपलब्ध असलेले विषय, प्रवेश शुल्क इत्यादी महाविद्यालय नोंदणी प्रपत्रात नमूद केलेली माहिती तपासून शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), पुणे/केंद्रिय प्रवेश समितीने निश्चित केलेल्या ऑनलाईन संकेतस्थळावर अंतिम करणे बंधनकारक असेल.


(२२.२) शासन आदेशान्वये वेळोवेळी निर्गमित केलेली प्रवेशासबंधी शासन आदेश/परिपत्रके, शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), पुणे/केंद्रिय प्रवेश समितीने निश्चित केलेल्या ऑनलाईन सेवा पुरवठादारास विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून वेळेत उपलब्ध करुन देणे,


(२२.३) कार्यक्षेत्रातील सर्व उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांच्या ठिकाणाचा नकाशा विभागीय शिक्षण उपसंचालक हे शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), पुणे/केंद्रिय प्रवेश समितीस उपलब्ध करुन देतील.


(२२.४) माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक/शिक्षक, विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करतील याबाबतचे सनियंत्रण करणे.


(२२.५) प्रवेशासंदर्भात संपूर्ण व वस्तुनिष्ठ माहिती प्रसारमाध्यमांमध्ये वेळोवेळी प्रकाशित करतील. तसेच विविध प्रसार माध्यमांतून ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेस व्यापक प्रमाणात विभागीय शिक्षण उपसंचालक, यांच्याकडून प्रसिध्दी देण्यात येईल.


(२२.६) विभागीय शिक्षण उपसंचालक मुंबई, पुणे, नागपुर, अमरावती, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लातूर व कोल्हापूर यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांकडून प्राप्त झालेली माहिती (उदा. शाखा निहाय तुकड्या, माध्यम, अनुदानित, अंशतः अनुदानित, विना-अनुदानित, कायम विना-अनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित इत्यादी) मान्यता विषयक बाबींची तपासणी करणे. संकेतस्थळावर अशा मान्यता प्राप्त उच्च माध्यमिक (कला, वाणिज्य व विज्ञान) सर्व शाखांची नोंदणी झाल्याची खातरजमा करणे. सदर माहिती अंतिम करण्याची जबाबदारी विभागीय शिक्षण उपसंचालक यांची असेल.


(२२.७) सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक यांना त्यांच्या अधिनस्त क्षेत्रातील सर्व उच्च माध्यमिक प्रवेश क्षमता, माध्यम, तुकडी, शाखा मान्यता इ. ची खातरजमा करण्यास प्राधिकृत करण्यात येत आहे.


(२३) शिक्षणाधिकारी (माध्यमिक) व शिक्षण निरीक्षक, मुंबई यांची जबाबदारी -


(२३.१) शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांकडून प्राप्त झालेली माहिती उदा, शाखा निहाय तुकड्या, माध्यम, अनुदानित, अंशतः अनुदानित, विना अनुदानित, कायम विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित वर्गनिहाय व शाखानिहाय विद्यार्थी प्रवेश क्षमता कनिष्ठ महाविद्यालयामध्ये उपलब्ध असलेले विषय इत्यादी उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालय यांनी रजिस्ट्रेशन फॉर्ममध्ये नमूद केलेली माहिती तपासून शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), पुणे/केंद्रिय प्रवेश समितीने निश्चित केलेल्या ऑनलाईन संकेतस्थळावर अद्ययावत करण्यासाठी विभागीय उप संचालक यांना सहाय्य करणे,


(२३.२) शासन आदेशान्वये वेळोवेळी निर्गमित केलेली प्रवेशासबंधी शासन आदेश/परिपत्रके, केंद्रिय प्रवेश समितीस निश्चित केलेली माहिती वेळेत उपलब्ध करुन दिली जाईल.


(२३.३) आपल्या कार्यक्षेत्रातील उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या ठिकाणाचा नकाशा


विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडे तयार करून सादर करणे.


(२३.४) माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक/शिक्षक, पालक, विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करतील. प्रवेशासंदर्भात संपूर्ण व वस्तूनिष्ठ माहिती शाळांपर्यंत पोहोच करतील. तसेच विविध प्रसार माध्यमांतून ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेस व्यापक प्रमाणात तसेच शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद सर्व यांच्याकडून प्रसिध्दी देण्यात येईल.


(२४) प्रवेशाचे वेळापत्रक :-


शाळा/महाविद्यालयांची माहिती संकेतस्थळावर भरणे व अद्यावत करणे, उदा. महाविद्यालयाचे नाव, पत्ता, पिनकोड, अल्पसंख्यांक दर्जा (धार्मिक/भाषिक), जिओ लोकेशन, जवळचे रेल्वे स्टेशन, बसस्थानक/बसस्टॉप, बैंक खाते धारक नाव, बैंक खाते क्रमांक, बँकेचे नाव, बैंक शाखा व आयएफएससी कोड, संपर्क क्रमांक, ई मेल आयडी, शाळेचे संकेतस्थळ, वार्षिक शुल्क, संपर्क करावयाच्या व्यक्तीचे नाव व पदनाम इ.
दिनांक ०८ मे ते १५ मे २०२५
विभागीय शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी उच्च माध्यमिकच्या शाखांची माहिती प्रमाणित करणे.
दिनांक ०८ मे ते १६ मे २०२५
विद्यार्थ्यांचे ऑनलाईन प्रोफाईल तयार करणे
दिनांक १९ मे ते २८ मे २०२५
विद्यार्थ्यांनी प्राधान्यक्रम भरणे,
दिनांक १९ मे ते २८ मे २०२५
शुन्य फेरी व्यवस्थापन कोटा, अल्पसंख्यांक व इनहाऊस कोट्यातील प्रवेश निश्चित करणे.
प्रवेश प्रक्रिया सुरु करणेपूर्वी
प्रथम फेरी घोषित करणे व प्रवेश घेणे
प्रवेश प्रक्रिया सुरु करणेपूर्वी
व्दितीय फेरी घोषित करणे व प्रत्यक्ष प्रवेश घेणे.
प्रवेश प्रक्रिया सुरु करणेपूर्वी
तृतीय फेरी घोषित करणे व प्रत्यक्ष प्रवेश घेणे.
प्रवेश प्रक्रिया सुरु करणेपूर्वी
चतुर्थ फेरी घोषित करणे व प्रत्यक्ष प्रवेश घेणे.
प्रवेश प्रक्रिया सुरु करणेपूर्वी


"सर्वांसाठी खुले (OPEN FOR ALL)" व प्रत्यक्ष प्रवेश घेणे.
प्रवेश प्रक्रिया सुरु करणेपूर्वी
उच्च माध्यमिकचे ११ वी चे वर्ग सुरु करणे.
११ ऑगस्ट २०२५ किंवा
शासन निर्धारित करेल त्या दिनांकास.


संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ही शेवटचा विद्यार्थी प्रविष्ट होईपर्यंत गुणवत्तेनुसार ऑनलाईन पध्दतीने करण्यात यावी. ऑनलाईन प्रणाली व्यतिरिक्त अन्य प्रणालीमधून एकही प्रवेश शाळा व्यवस्थापनास करता येणार नाहीत.


(२५) राज्यस्तर समितीने संपूर्ण प्रवेश प्रक्रियेची माहिती पुस्तिका, आरक्षण, प्रवेश प्रक्रिया, टप्पे, वेळापत्रक इ. अनुषंगिक माहिती प्रकाशित करावी.


(२६) क्षेत्रस्तरावर ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुलभ व सुकर होण्याच्या दृष्टीकोनातून राज्यस्तर ते जिल्हास्तरापर्यंत पुढीलप्रमाणे समिती गठित करण्यात येत आहेत.

नवनवीन शैक्षणिक विडियो पाहण्यासाठी गरुडझेप .... यशस्वीतेकडे वाटचाल...........



या यूट्यूब चॅनल वर तुमचे हार्दिक स्वागत . 

Pls subscribe for more educational video.

 watch more and full videos

youtube.com/@rajangarud

https://rajangarud.com

https://www.facebook.com/rajan.garud/

https://www.instagram.com/?hl=en

https://twitter.com/RAJANGARUD2

join whatsapp group here 👉👉  

https://chat.whatsapp.com/DniwyWhfoLBEc

cs8hjqOmZ
  • थोडे नवीन

    इयत्ता ११ वी प्रवेश प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात होणार ऑनलाईन.. Update Class 11th Admission Process 2025-26

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)