आता परीक्षा पुस्तकासह होणार .. CBSE Open Book Exam

 CBSE Open Book Exam 

आता परीक्षा पुस्तकासह होणार .. 



 केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) नववीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता नववीच्या परीक्षा Open Book पद्धतीने घेतल्या जाणार आहेत. या निर्णयानुसार, परीक्षेवेळी विद्यार्थ्यांना त्यांची पुस्तकं, नोट्स आणि संदर्भ ग्रंथ सोबत ठेवण्याची आणि त्यांचा वापर करण्याची परवानगी असेल. या बदलामागे विद्यार्थ्यांवरील परीक्षेचा ताण कमी करणे हा मुख्य उद्देश आहे. यापुढे केवळ पाठांतरावर भर न देता, संकल्पनांच्या स्पष्टीकरणावर अधिक लक्ष केंद्रित केले जाईल. "परीक्षेचं ताण कमी करून संकल्पनांच्या स्पष्टीकरणावर आता भर दिला जाणार आहे," असे मंडळाने स्पष्ट केले आहे. हा निर्णय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या पद्धतीत सकारात्मक बदल घडवून आणेल अशी अपेक्षा आहे. यामुळे विद्यार्थ्यांना विषयांची सखोल माहिती मिळण्यास मदत होईल आणि त्यांचे आकलन अधिक सुधारेल, असे बोलले जात आहे. 


काय आहे 'ओपन बुक' पद्धती?

'ओपन बुक' परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळेस आपली पाठ्यपुस्तके, नोट्स आणि संदर्भग्रंथ सोबत ठेवण्याची मुभा दिली जाते. या पद्धतीचा उद्देश केवळ माहिती पाठ करून लिहिण्यापेक्षा विषयांच्या संकल्पना समजून घेणे, त्यांचे विश्लेषण करणे आणि त्याचा योग्य उपयोग करणे या कौशल्यांचा विकास करणे आहे.


निर्णयामागील हेतू काय? 

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे की, "परीक्षेचा ताण कमी करून संकल्पनांच्या स्पष्टीकरणावर अधिक भर दिला जाणार आहे." याचा अर्थ असा की विद्यार्थ्यांनी विषय समजून घेतले आहेत का, हे तपासले जाणार आहे, आणि केवळ पाठांतरावर अवलंबून राहून गुण मिळवण्याची पद्धत मागे पडणार आहे.


पायलट अभ्यासानंतर घेतला निर्णय

डिसेंबर 2023 मध्ये CBSE ने इयत्ता 9 वी ते 12 वी साठी 'ओपन बुक असेसमेंट' या मूल्यांकन पद्धतीचा एक पायलट अभ्यास (Pilot Study) सुरू केला होता. या अभ्यासात विद्यार्थ्यांच्या कामगिरीतून असे स्पष्ट झाले की, त्यांचे गुण 12 टक्के ते 47 टक्क्यांच्या दरम्यान होते. यावरून हे लक्षात आले की, विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकांचा, वर्गातील नोट्सचा आणि ग्रंथालयातील पुस्तकांचा उपयोग करण्यात अडचणी येत होत्या.


या उपक्रमाबाबत शिक्षकांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. शिक्षकांना वाटते की, ही नवी पद्धत विद्यार्थ्यांमध्ये चिंतनशील (Critical Thinking) विचारांना चालना देईल. पायलट अभ्यासामध्ये काही अडचणी आल्याचं मान्य करण्यात आलं असलं तरी, शिक्षकांचा सकारात्मक दृष्टिकोन लक्षात घेता, CBSE च्या गव्हर्निंग बॉडीने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. आता CBSE ओपन बुक परीक्षांसाठी सैंपल पेपर्स तयार करण्याच्या कामाला सुरुवात करणार आहे.



Rajan garud

प्राथमिक शिक्षक महाराष्ट्र राज्य क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षक नवोपक्रमशील पुरस्कार प्राप्त. सर फाऊंडेशन पालघर जिल्हा समन्वयक उत्तम कलाकार

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال