लवकरच होतील 2026 ची शिक्षक ऑनलाइन बदली Badali Update 2026 ऑनलाईन बदली प्रक्रिया २०२६ बाबत ग्राम विकास विभाग आदेश 4 नोव्हेंबर 2025 नक्की वाचा.

 लवकरच होतील 2026 ची शिक्षक ऑनलाइन बदली 

 Badali Update 2026 ऑनलाईन बदली प्रक्रिया २०२६ बाबत ग्राम विकास विभाग आदेश 4 नोव्हेंबर 2025 नक्की वाचा. 



Badali Update 2026
ऑनलाईन बदली प्रक्रिया २०२६ बाबत ग्राम विकास विभाग आदेश 4 नोव्हेंबर 2025


जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदलीबाबतचे वेळापत्रक व इतर सूचना बाबत महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाने दिनांक 4 नोव्हेंबर 2025 रोजी १) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व). व २) मे. विन्सीस आय.टी. सर्व्हिसेस प्रा.लि, पुणे यांना पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
संदर्भ:
१) शासन निर्णय क्र. जिपब-२०२३/प्र.क्र.११८/आस्था-१४, दि.१८.६.२०२४.
२) शासन पत्र क्र. न्यायाप्र-२०२४/प्र.क्र.१०५/आस्था-१४, दि.७.११.२०२५.
३) मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी रिट याचिका क्र. १२१४०/२०२५ आणि अन्य संलग्न याचिकांवर दि.२३.९.२०२३ रोजी दिलेला न्याय-निर्णय.

महोदय,

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदलीबाबतचे धोरण संदर्भ क्र. १ येथील दि.१८.६.२०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये सुधारित करण्यात आले आहे. या शासन निर्णयातील तरतुदीनुसार जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबतचे वेळापत्रक संदर्भ क्र. २ येथील दि.७.११.२०२४ रोजीच्या पत्रान्वये विहीत करण्यात आले आहे. या विहीत वेळापत्रकानुसार मे. विन्सीस आयटी प्रा.लि., पुणे यांच्याकडून सन २०२५ ची जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया ऑनलाईन पोर्टलव्दारे पार पडली आहे.

२. सन २०२५ च्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेदरम्यान बहुतांश न्यायालयीन प्रकरणे ही संबंधित जिल्हा परिषदांनी विहीत मुदतीमध्ये अवघड क्षेत्र घोषित न केल्यामुळे, बदलीपात्र/बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या याद्यांमध्ये अचुकता नसल्यामुळे तसेच रिक्त पदांची माहिती अचूक न भरल्यामुळे उद्भवलेली आहेत. या सर्वांच्या परिणाम स्वरुप सदर बदली प्रक्रिया ही दि.३१ मे, २०२५ पर्यंत पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे विविध न्यायालयीन प्रकरणास शासनास सामोरे जावे लागले.

३. जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया सन २०२५ बाबत मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे दाखल रिट याचिका क्र.१२१४०/२०२५ व अन्य संलग्न याचिकांवर मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी दि.२३.९.२०२५ रोजी दिलेल्या न्याय-निर्णयामध्ये प्रधान सचिव (ग्राम विकास) यांनी सन २०२६-२७ च्या बदली प्रक्रियेमध्ये विलंब होणार नाही, याकरीता आवश्यक त्या सूचना निर्गमित करणेबाबत तसेच दि.७.११.२०२४ रोजीच्या पत्रान्वये यापूर्वी निश्चित केलेल्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेच्या वेळापत्रकाबाबत देखील उचित सूचना निर्गमित करण्याबाबत आदेशित केले आहे.

४. मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी दिलेले निर्देश व जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया २०२५ यावत उपरोक्त नमुद वस्तुस्थिती विचारात घेता, जिल्हा परिषद शिक्षकांच्या यापुढील जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेच्या अनुषंगाने सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना खालीलप्रमाणे अतिरिक्त सूचना देण्यात येत आहेत:-

१) जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबत शासनाच्या दि.७.११.२०२४ रोजीच्या पत्रान्वये विहीत केलेल्या वेळापत्रकाचे काटेकोरपणे पालन करावे.

२) दि.१८.६.२०२४ रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेकरीता संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद हे सक्षम प्राधिकारी आहेत.

३) त्यामुळे उपरोक्त वेळापत्रकानुसार सन २०२६ ची जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया विहीत वेळेत पार पाडण्याबाबत सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद व मे. विन्सीस आयटी सर्व्हिसेस प्रा.लि.. पुणे यांना सूचित करण्यात येत आहे.

४) शासन निर्णयातील तरतुदीनुसार बदली प्रक्रिया राबविण्याकरीता (तांत्रिक बाबींसाठी) सर्व जिल्हा परिषदांनी एका समन्वय अधिकाऱ्याची/कार्यक्रम अधिकाऱ्याची नेमणूक करावी.

५) बदली प्रक्रियेदरम्यान जिल्हा स्तरावरील सर्व तांत्रिक अडचणी दुर करण्याची जबाबदारी संबंधित समन्वय अधिकारी/कार्यक्रम अधिकारी यांची राहील.

६) तसेच बदली प्रक्रियेदरम्यान उद्भवणाऱ्या तांत्रिक अडचणींचे निराकरण करण्याकरीता मे. विन्सीस आयटी सर्व्हिसेस प्रा.लि., पुणे यांनी प्रत्येक जिल्हा परिषदेकरीता आवश्यकतेनुसार समन्वय अधिकाऱ्यांची नेमणूक करावी.

७) त्यानुसार उपरोक्त विहीत वेळापत्रकानुसार जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया पूर्ण करण्याबाबतची जबाबदारी सर्व जिल्हा परिषदांची आहे.

८) सर्व जिल्हा परिषदांनी मे. विन्सीस आयटी सर्व्हिसेस प्रा.लि., पुणे यांच्याशी परस्पर समन्वयाने विहीत वेळापत्रकानुसार व विहीत केलेल्या टप्प्यांनुसार पुढील बदली प्रक्रिया पूर्ण करावी.

९) बदली प्रक्रियेकरीता शासन स्तरावरुन केवळ धोरणात्मक बाबीच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात येईल.

१०) तथापि, बदली प्रक्रियेदरम्यान उपस्थित तांत्रिक अडचणी मे. विन्सीस आयटी सर्व्हिसेस प्रा.लि., पुणे यांचेशी परस्पर समन्वयाने सोडविण्याची संपूर्ण जबाबदारी सर्व जिल्हा परिषदांची आहे.

११) बदली प्रक्रियेकरीता विलंब झाल्यास याबाबतची संपूर्ण जबाबदारी संबंधित जिल्हा परिषदेची राहील, याची नोंद घेण्यात यावी.

१२) उपरोक्त सूचना सर्व संबंधितांच्या निदर्शनास आणण्यात याव्यात.


आपली, (ज्योत्स्ना अर्जुन)कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन
प्रत :- शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद (सर्व).

Rajan garud

प्राथमिक शिक्षक महाराष्ट्र राज्य क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षक नवोपक्रमशील पुरस्कार प्राप्त. सर फाऊंडेशन पालघर जिल्हा समन्वयक उत्तम कलाकार

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال